Meditation
Holy Place
Spirituality

श्री संत

सद्गुरू गणेशनाथ महाराज

तीर्थक्षेत्र उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर, महाराष्ट्र - ४१३५२०

श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज चरित्र

श्री भक्तविजय - अध्याय ५५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजगदीश्वराय नमः जय जय अचळा अव्यया अविनाशा ॥ अनामा अरूपा परमपुरुषा ॥ ब्रह्मांडनायका जगन्निवासा ॥ स्वानंदाधीशा श्रीहरि ॥१॥ निजभक्त करिती तुझें स्मरण ॥ तुजलागीं त्यांचें निदिध्यासन ॥ जैसे चातक आणि मेघ जाण ॥ मित्रपणें नांदती ॥२॥ कीं बाळ मातेची करी खंती ॥ तिजलागीं लोभ तैशाच रीती ॥ तेविं प्रेमळ भक्तांची जैसी वृत्ति ॥ होसी रुक्मिणीपति त्यांसारिखा ॥३॥ कीं पौर्णिमेचा चंद्रप्रकाश घन ॥ मनीं उल्लासे सागर देखोन ॥ तेविं निजभक्तांची कीर्ति ऐकोन ॥ तूं जगज्जीवन संतोषसी ॥४॥ भक्तिं वर्णिली तुझी स्तुति ॥ तुजही आवडे त्यांची कीर्ति ॥ म्हणोनि चरित्रें मजहातीं ॥ भक्तविजय ग्रंथीं लिहविलीं ॥५॥ मागील अध्यायाचे अंतीं निश्चित ॥ बोधराजें अविंधास दाविली प्रचीत ॥ मग टाकूनियां धनसंपत ॥ हरिभजनीं प्रीत लाविली ॥६॥ आतां सज्ञान विवेकी अति विरक्त ॥ सद्गुरुउपासक गणेशनाथ ॥ त्याचें चरित्र अति अद्भुत ॥ ऐका निजभक्त भाविक हो ॥७॥ बालेघांटप्रांतीं जाण ॥ सारसी उज्जनीं नगरें दोन ॥ तेथें जयाचें अधिष्ठान ॥ सप्रेम कीर्तन करीतसे ॥८॥ सैली मुद्रा कानीं असती ॥ वस्त्र कौपीन नेसे प्रीतीं ॥ याविरहित कांहीं उपाधि निश्चिती ॥ नावडे चित्तीं तयाचें ॥९॥ दिवसा राहून अरण्यांत ॥ एकांतीं श्रीहरीचें भजन करित ॥ रात्रीं नगरांत प्रेमभरित ॥ गुणानुवाद वर्णीतसे ॥१०॥ नावडे कवणाचा सन्मान ॥ लौकिक पूजा दांभिक भजन ॥ नावडे वस्त्र संपत्ति धन ॥ मिष्टान्नभोजन नावडे ॥११॥ तंव शिवाजी पंढरीसी ॥ यात्रेस आला एके दिवसीं ॥ ऐकूनि गणेशनाथाचे कीर्तिसी ॥ आला भेटीसी नृपवर ॥१२॥ करूनियां साष्टांग नमन ॥ श्रवण करीत बैसला कीर्तन ॥ गणेशनाथाचें विशाल ज्ञान ॥ कवित्व बोलणें प्रासादिक ॥१३॥ नानापरेंचे दृष्टांत देऊन ॥ अभंग रची जैसे बाण ॥ तेणें श्रोतयांचे श्रवण ॥ सुख पावती अपार ॥१४॥ तंव शयन करावया आपणातें ॥ पलंग करविला नृपनाथें ॥ म्हणे प्रथम दिवसीं गणेशनाथ ॥ निजवावा निश्चित यावरी ॥१५॥ मग कर जोडोनि म्हणे स्वामी ॥ एक रात्र क्रमावी आमुचे आश्रमीं ॥ तल्पक करविला नूतन आम्हीं ॥ म्हणोनि चरणीं लागला ॥१६॥ पाहूनि नृपवराचा आदर ॥ नाथासी संकट पडिलें थोर ॥ जैसा कां हरिणीसी नेऊं म्हणतां व्याघ्र ॥ भयें अंतर कांपे तिचें ॥१७॥ संकट जाणोनि ते वेळ ॥ अवश्य म्हणे वैराग्यशीळ ॥ मग खडे वेंचोनि एक ओंजळ ॥ पदरीं बांधिले तेधवां ॥१८॥ देखोनि नृपवर पुसे तया ॥ कंकर वेंचोनि घेतले कासया ॥ येरू उत्तर देत तया ॥ गणती घ्यावया नामांची ॥१९॥ शिबिकेंत बैसवोन ते आसरीं ॥ राजा घेऊन गेला बिढारीं ॥ सुमनशेज रचोनि वरी ॥ गणेशनाथासी निजविलें ॥२०॥ त्रयोदशगुणी करून विडे ॥ तबकीं ठेविले तया पुढें ॥ समया लावूनि अतिनिवाडें ॥ टाकिले पडदे चहूंकडे ॥२१॥ नानापरींचे परिमळ निश्चिती ॥ उपचार विलासभोग संपत्ति ॥ ठेवूनियां तेथें नृपति ॥ बाहेर आला सत्वर ॥२२॥ तों स्पर्शविषय देखोनि नेत्रीं ॥ अनुताप वाटला सकळ गात्रीं ॥ जैसा कां द्विज अग्निहोत्रीं ॥ यवनमंदिरीं कोंडिला ॥२३॥ कीं व्यघ्र जितचि धरूनि गाय ॥ आपुले जाळींत घेऊनि जाय ॥ ते जैसी लवकर निघों पाहे धरूनि भय मानसीं ॥२४॥ नातरी काननींहूनि आणिलें हरिण ॥ राजमंदिरीं बांधिलें जाण ॥ मग तें मानसीं इच्छीत पूर्ण ॥ जाईन सुटोन कधीं मी ॥२५॥ कीं घृतांत जिवंत धरोनि मासा ॥ घालितां तळमळ करी जैसा ॥ राजाचा भोगउपचार तैसा गणेशनाथासी वाटला ॥२६॥ कीं नूतन रावा पिंजर्‍यांत घातला ॥ मग चारा पाणी न रुचे त्याला ॥ तेवीं तल्पकावरी विरक्त भला ॥ कंटाळला ते रीतीं ॥२७॥ सांगातें घेतले होते कंकर ॥ ते पसरूनि टाकिले पलंगावर ॥ त्याजवरी निजले घटिका चार ॥ तंव उदयासी दिनकरे पातला ॥२८॥ राया दर्शनासी आला झडकरी ॥ तों खडे आंथरले पलंगावरी ॥ विस्मित होऊनि निजअंतरीं ॥ नमस्कार करी साष्टांग ॥२९॥ नाथासी पुसे जोडोनि कर ॥ तंव ते देंती प्रत्युत्तर ॥ शयन करितां पलंगावर ॥ निद्रा अघोर लागेल कीं ॥३०॥ तुझा हेत व्हावया पूर्ण ॥ खडे पसरूनि केलें शयन ॥ जरी सुख दिधलें जीवाकारण ॥ तरी पुढें दुःख भोगणें तितुकेंचि ॥३१॥ जैसी खरूज खाजवितां पाहीं ॥ परम सुख वाटे ते समयीं ॥ मग खाज निघोनि गेल्या देहीं ॥ सौख्य कांहीं पडेना ॥३२॥ नातरी भोजन करितां गोड वाटे ॥ परी वमन करितां जीव कष्टे ॥ तेवें शयनसुख आधीं गोमटें ॥ मग परिणामीं खोटें देहासी ॥३३॥ कां बचनाग आधीं मधुर लागत ॥ परी खाणार प्राणासी मुकत ॥ तेवीं विषय भोगितां भय सत्य ॥ जाण निश्चित नृपनाथा ॥३४॥ ऐसें ऐकतांचि वचन ॥ अनुताप जाहला रायाकारण ॥ म्हणे आजपासूनि मी पलंगीं शयन ॥ न करीं जाण सर्वथा ॥३५॥ निश्चय करूनि निजमानसीं ॥ तल्पक अर्पिला ब्राह्मणासी ॥ संतसंगाची महिमा ऐसी ॥ ब्रह्मादिकासी अगम्य ॥३६॥ गणेशनाथाची ऐसी स्थित ॥ तीन्ही अवस्था वैराग्यभरित ॥ वस्ती न करीचि ग्रामांत ॥ हिंडे अरण्यांत सर्वदा ॥३७॥ स्वदेशांत कीर्तन होतां जाण ॥ दर्शना येती भाविक जन ॥ नित्य अनुग्रह एकालागून ॥ स्वइच्छेनें देतसे ॥३८॥मस्तकीं हस्त पडतां जाण ॥ शिष्याचें उडे प्रपंचभान ॥ तो संसारधंदा टाकून रानोरान हिंडतसे ॥३९॥ तो खळ अथवा दुराचार ॥ निंदक अथवा सज्ञान नर ॥ परी नाथाचा शिरीं पडलिया कर ॥ अपार वैराग्य होय तया ॥४०॥ ऐसा एक संवत्सर जंव लोटे ॥ तंव शिष्य जाहले तीनशेंसाठ ॥ लंगोटबंद वैराग्य उद्भट ॥ आत्मज्ञान स्पष्ट पावले ॥४१॥ पुरीं पैठणीं लोक बोलती ॥ जे कां याचा उपदेश घेती ॥ त्यांची तत्काळ उडोनि प्रपंचभ्रांती ॥ मागें हिंडती सद्गुरूचे ॥४२॥ एक म्हणती चेटकी दारुण ॥ एक म्हणती घालितो मोहन ॥ एक म्हणती आत्मज्ञान ॥ ठसावलें संपूर्ण तयासी ॥४३॥ एक म्हणती हा स्वयें पांडुरंग ॥ एक म्हणती हें अत्यंत ढोंग ॥ एक म्हणती त्याचा संग ॥ करितां भवभंग होतसे ॥४४॥ एक म्हणती त्याचे दर्शना ॥ इतःपर जाऊं न द्यावें कोणा ॥ एक म्हणती होणार चुकेना ॥ प्राक्तनीं असेल जें काहीं ॥४५॥ एक म्हणती त्याची भेटीं ॥ घेऊन सांगों चार गोष्टी ॥ कीं बहुतांचें जीवांची करूनि साटी ॥ पडली तुटी संसारा ॥४६॥ ऐसें म्हणोनि एके दिवशीं ॥ आले नाथाचें दर्शनासी ॥ तों हे आम्रवृक्षाचे छायेसी ॥ बैसले होते ध्यानस्थ ॥४७॥ मानसपूजा झालिया त्वरित ॥ गणेशनाथ पाहे भोंवत ॥ कीं शिष्य बोलावूनि येथ ॥ मस्तकीं हस्त ठेवावा ॥४८॥ तंव उभे ठाकूनि ते वेळ ॥ काय बोलती निंदक खळ ॥ तुम्हीं शिष्य करूनि भोळसाळ ॥ आपुल्या मागें लाविले ॥४९॥ बहुतांचे संसारा केली तुटी ॥ म्हणोनि लोक होताती कष्टी ॥ आतां आम्हीं सांगतों एक गोष्टी ॥ तरी त्याचि राहाटीं वर्तावें ॥५०॥ तुम्हीं संत आत्मज्ञानी ॥ दृष्टीसी सारिख्या चारी खाणी ॥ तरी झाडासी उपदेश आजपासोनि ॥ करीत जावा निजकृपें ॥५१॥ अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ तत्काळ कौतुक दाखविलें नयनीं ॥ जें मृत्युलोकीं नानासाधनीं ॥ नये घडोनि सर्वथा ॥५२॥ चूतवृक्ष जुनाट होता तेथ ॥ त्यासी उपदेश देऊनि त्वरित ॥ मस्तकीं ठेवूनियां हस्त ॥ तारक मंत्र सांगितला ॥५३॥ ऐसें दृष्टीस देखोन ॥ काय बोलती ते विलक्षण ॥ मनुष्यांसी अनुग्रह सांगतां जाण ॥ जे प्रपंचभान टाकिती ॥५४॥ हा उपदेश ठसावला वृक्षासी ॥ हें कैसें अनुभवेल आम्हांसी ॥ तरी चमत्कार दाऊनियां निजकृपेसी ॥ संशय निरसीं सकळांचा ॥५५॥ तंव भाकरभाजी याजकारण ॥ नैवेद्यासी आणिली होती कवण ॥ गणेशनाथें ते उचलोन ॥ आपुले करीं घेतली ॥५६॥ उपदेश दीधला ज्या वृक्षाकारण ॥ तयासी काय बोलिला वचन ॥ हा देवाचा प्रसाद मुख पसरून ॥ प्रीतींकरोन भक्षीं कां ॥५७॥ ऐसें बोलतां सद्गुरुनाथ ॥ तंव अद्भुत कौतुक वर्तलें तेथ ॥ झाडाचें खोड अकस्मात ॥ उकललें सर्वांदेखतां ॥५८॥ त्यामाजी भाकर घालितां देख ॥ मिळोनि गेलें पहिल्याचसारिख ॥ देखोनि आश्चर्य करिती लोक ॥ तन्मय सकलिक झाले कीं ॥५९॥ गणेशनाथासी ते वेळ ॥ नमस्कार करिती विचक्षण खळ ॥ म्हणती तुजऐसा भक्त प्रेमळ ॥ सज्ञान निर्मळ नसेचि ॥६०॥ आम्हीं अहंकार धरूनि मना ॥ व्यर्थचि केली तुमची छळणा ॥ ऐशारीतीं बोलोनि वचना ॥ आपुल्या सदना ते गेले ॥६१॥ एके दिवसीं गणेशनाथ ॥ अरण्यामाजी कीर्तन करीत ॥ श्रवणासी आले सज्ञान पंडित ॥ आणि वैष्णवभक्त विवेकी ॥६२॥ वैदिक शास्त्रज्ञ आणि भाविक ॥ अठरा वर्णांचे मिळाले लोक ॥ कीर्तनप्रेमाचें निजसुख ॥ पहावयासी पातले ॥६३॥ टाळ विणे मृदंग वाजत ॥ नामघोषगजर होत ॥ नादें अंबर भरूनि तेथ ॥ कोंदोनि गेलें तेधवां ॥६४॥ तंव वरते करूनि हात ॥ पताका करवी गणेशनाथ ॥ हें देखोनि सज्ञान पंडित ॥ काय बोलत तें ऐका ॥६५॥ तूं तरी भराडी जातीचा हीन ॥ आम्हीं तों ब्राह्मण उंचवर्ण ॥ कीर्तनीं टाळ्या तुझे वचनेंकरून ॥ न पिटूं जाण सर्वथा ॥६६॥ यावरी गणेशनाथ उत्तर देत ॥ म्हणे ताडाचा वृक्ष उंच बहुत ॥ परी त्याची छाया उपयोगीं निश्चित ॥ नाहीं पडत कोणाचे ॥६७॥ तेवीं अठरा वर्णांमाजी निपुण ॥ विप्र तंव वरिष्ठ पूज्यमान ॥ परी कीर्तनाचे उपयोगीं जाण ॥ तुमचे कर न पडती ॥६८॥ तरी आतां स्वस्थ करूनि मन ॥ उगेंचि तुम्हीं करावें श्रवण ॥ टाळिया वाजवितील पाषाण ॥ तुमचे कृपेनें स्वामिया ॥६९॥ ऐसें बोलतां वैराग्यशीळ ॥ तो नवल वर्तलें देखती सकळ ॥ दगडगोटे होते माळ्यावर ॥ तो एकाएकीं उठिले पैं ॥७०॥ जैशा करताळिया वाजती देख ॥ तैसे लागती एकासी एक ॥ ऐसें देखोनियां कौतुक ॥ तटस्थ लोक पाहाती ॥७१॥ म्हणती हें कौतुक अभिनव ॥ दगडांसी कैसा आणिला जीव ॥ गणेशनाथाचा अनुपम भाव ॥ न कळे माव इंद्रादिकां ॥७२॥ मग चित्तीं अनुताप धरून ॥ टाळ्य़ा वाजविती सकळ ब्राह्मण ॥ गणेशनाथाचें समाधान ॥ जाहलें इतुकेन तेधवां ॥७३॥ तों माध्यान्हीं आला गभस्ती ॥ मग उजळिली मंगळारती ॥ खिरापत घेऊनि निश्चितीं ॥ सदनाप्रती लोक गेले ॥७४॥ आम्हीं अहंकार धरून व्यर्थ केलें त्याचें छळण ॥ ऐशापरी वचनें बोलून ॥ वाखाणिती गणेशनाथा ॥७५॥ गणेशनाथ प्रेमळ भक्त ॥ त्यासी वर देती पंढरीनाथ ॥ उज्जनी आणि सारशांत ॥ यात्रा भरत अद्यापि ॥७६॥ संत महंत वैष्णव प्रेमळ ॥ चमत्कार जागृत असे तें स्थळ ॥ निजभक्तांची कीर्ति चिरकाळ ॥ दीनदयाळ वाढवितो ॥७७॥

My PDF Document